बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील स्पेक्ट्रोकेम या कंपनीतील कामगारांनी वेतनवाढीसाठी कारखान्याच्या प्रवेशद्वाराबाहेर कामबंद आंदोलन सुरू केले आहे. कारखाना व्यवस्थापन कामगार आणि कर्मचाऱ्यांना जो पर्यंत न्याय वेतनवाढ देत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कामगारांनी केला आहे असे वृत्त लोकसत्ता वृत्तसंस्थेने दिले आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक ई- ८८,८९,९६,९७,९८,९९,१०० ई- ५५, ६/२, १३ वरील स्पेक्ट्रोकेम प्रा.ली. या कारखान्यामध्ये औषधांमध्ये वापरण्यात येणाऱ्या रासायनिक पदार्थांचे उत्पादन घेतले जाते. कारखान्यात १२९ कायम आणि ७० कंत्राटी अशा जवळपास २०० कामगार आणि कार्यालयीन कर्मचारी काम करीत आहेत. या कामगारांनी आपल्याला नियमानुसार वेतनवाढ मिळावी यासाठी भारतीय कामगार कर्मचारी महासंघ या कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली २८ जानेवारीपासून संपाचे हत्यार उचलले आहे.
सर्व कामगारांनी तारापूर औद्योगिक क्षेत्रातील स्पेक्ट्रोकेम कारखान्याच्या प्रवेशद्वाराबाहेर ठिय्या मांडून कामबंद आंदोलन सुरू केल्याने कारखान्यातील उत्पादन ठप्प झाले आहे. कामगारांच्या मागणीवर तोडगा निघावा यासाठी पालघर येथील कामगार उपायुक्त कार्यालयात कारखाना व्यवस्थापन आणि कामगार संघटना प्रतिनिधी यांची दोन वेळा बैठक पार पडली, मात्र या बैठकीमध्ये कोणताही तोडगा न निघाल्यामुळे पुन्हा दोन जानेवारी रोजी बैठक घेण्यात येणार आहे.
तारापूरच्या स्पेक्ट्रोकेम कारखान्यातील कामगार व कर्मचारी यांचा मागील २२ महिन्यांपासून व्यवस्थापनाविरोधात वेतनवाढीसाठी लढा सुरू आहे. कंत्राटी कामगारांना किमान वेतन आणि इतर सुविधा देखील देण्यात येत नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. कारखाना व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यामध्ये आतापर्यंत १० बैठका झाल्या आहेत.
कारखाना व्यवस्थापनाने कामगारांना पाच टक्के वेतनवाढ देण्याचे मान्य केले आहे, मात्र कामगारांना ही वेतनवाढ मान्य नसल्याने दोन्ही बाजूकडील चर्चा फिसकटली आहे. स्पेक्ट्रोकेम कारखाना व्यवस्थापन आणि कामगारांच्या वतीने भारतीय कामगार कर्मचारी महासंघ आपापल्या भूमिकेवर ठाम असून या प्रश्नी लवकर सकारात्मक तोडगा निघाला नाही तर कामगारांचा संप चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कामगारांच्या संपामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता कारखाना आवारात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
