'देवदूत' कामगारांच्या हक्कांसाठी मजदूर संघाचे आंदोलन

लोणावळा : ''द्रुतगती व राष्ट्रीय महामार्गावरील 'देवदूत' कामगारांच्या न्याय्य मागण्यांकडे आर्यन पंप कंपनी प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे,'' असा आरोप करत कुसगाव बु.येथे भारतीय मजदूर संघाच्या वतीने प्रजासत्ताक दिनी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

    पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघातावेळी मदत करणारी आणि अहोरात्र सेवा देणारी 'देवदूत' यंत्रणा कार्यरत आहे. या कामगारांना योग्य वेतन, सामाजिक सुरक्षा, विमा संरक्षण, सुरक्षितता साधने, निश्चित कामाचे तास व कायदेशीर हक्क मिळत नाहीत, असे सांगत या परिस्थितीविरोधात भारतीय मजदूर संघाने रस्त्यावर उतरून प्रशासनाचे लक्ष वेधले.

    दरम्यान, या प्रकरणी त्रिपक्षीय बैठकही झाली. यावेळी कंपनीकडून मनुष्यबळ विभागप्रमुख द्विवेश दिवाकर, व्यवस्थापक नीलेश कुडेकर उपस्थित होते. तर भारतीय मजदूर संघाकडून संघटन सचिव बाळासाहेब भुजबळ, उपाध्यक्ष सचिन मेंगाळे, सचिव सागर पवार, बाळासाहेब पाटील, उमेश विश्वाद यांच्यासह तालुक्यातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, आर्यन पंपचे कामगार प्रतिनिधी, कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती होती. यावेळी ''कामगारांच्या मागण्यांबाबत वरिष्ठ पातळीवर सकारात्मक चर्चा करून निर्णय घेण्यात येईल,'' असे आश्वासन कंपनी प्रतिनिधींनी दिले.

    बैठकीत झालेल्या लेखी समझोत्याअंतर्गत देवदूत कामगारांना सन्मानजनक वेतनवाढीबाबत निर्णय, कामगारांच्या पत्नी व मुलांना सध्या कार्यरत ३ लाख रुपयांच्या मेडिक्लेम योजनेत समाविष्ट करणे, सर्व कामगारांना अपघाती मृत्यू विमा योजनेंतर्गत २० लाख रुपयांचा लाभ, तसेच मागील कालावधीतील प्रलंबित ओव्हरटाइम वेतन लवकरच अदा करण्याचे मान्य करण्यात आले. या पार्श्वभूमीवर आंदोलन ३१ जानेवारीपर्यंत स्थगित करण्यात आल. मात्र, कंपनीकडून ठोस व सकारात्मक निर्णय न झाल्यास दोन फेब्रुवारीपासून बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.