विविध मागण्यांसाठी बेस्ट वर्कर्स युनियन व संघर्ष कामगार कर्मचारी युनियन संघटनेचे बेमुदत उपोषण

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बेस्ट वर्कर्स युनियन व संघर्ष कामगार कर्मचारी युनियन संघटनेने बेमुदत उपोषण सुरु केले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी 'समान कामाला समान दाम', सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकबाकी आणि वेतन करारातील प्रलंबित मागण्या यांसारख्या अनेक मागण्यांसाठी हे बेमुदत उपोषण पुकारण्यात आले आहे असे वृत्त Time महाराष्ट्र वृत्त संस्थेने दिले आहे.

यावेळी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. दिनांक १०.११.२०२५ रोजी सकाळी ११ वा. पासून बेस्ट वर्कर्स यूनियन व संघर्ष कामगार कर्मचारी युनियन या संघटनेचे सरचिटणीस शशांक राव यांचे कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करून घेण्याकरिता बेमुदत उपोषण सुरू झाले आहे. या आंदोलनास समर्थन देण्याकरिता मोठ्या संख्येने कार्यकर्ते, सभासद व कर्मचारी उपस्थित राहत आहेत.

विविध मागण्या पुढीलप्रमाणे :-

१. दिनांक १ १ जून, २०१९ रोजी बेस्ट वर्कर्स यूनियन सोबत झालेल्या कराराचे पालन करून बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीचा ३३३७ बसगाड्यांचा बसताफा राखण्यासाठी, म्हणजेच आयुष्यमान संपलेल्या बसगाड्यांच्या बदल्यात नवीन बसगाड्या विकत घेण्यासाठी आवश्यक आर्थिक निधी बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्वरित बेस्ट उपक्रम मंजूर करावा.

२.बेस्ट प्रशासनाने सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांची ग्रॅच्युइटीची पूर्ण रक्कम तातडीने द्यावी. तसेच जे कर्मचारी भविष्यात बेस्टच्या सेवेतून सेवानिवृत्त होणार आहेत, त्यांना सेवानिवृत्तीची देय असलेली रक्कम तातडीने मिळावी या करिता त्याचे नियोजन बेस्ट प्रशासनाने करावे.

३. मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट उपक्रमाशी संबंधित "क" अर्थसंकल्पाचे विलिनीकरण मुंबई महानगरपालिकेच्या "अ" अर्थसंकल्पात तातडीने करावे.

४.बेस्ट उपक्रमाने खाजगी कंत्राटदारामार्फत भाडेतत्वाने बस घेण्याची पद्धत कायमस्वरूपी बंद करावी.

५. बेस्ट कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी व मुंबई महानगरपालिका समकक्ष वेतनमान याचा समावेश असलेला प्रलंबित वेतनकरार, पदोन्नती, रिक्त जागा, अंतिम देयके, कोविड भत्ता, अनुकंपा तत्वावरील नोकऱ्या आणि इतर प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्यात यावा.

६.बेस्ट उपक्रमाच्या विद्युत पुरवठा विभागात २०१० व २०२४ मध्ये, व नंतर कायम करण्यात आलेल्या हंगामी (CL) कामगारांना ते सेवेत दाखल झालेल्या प्रथम दिवसापासून पूर्वलक्षी प्रभावाने नोकरीत कायम असल्याचे मानुन सुधारीत वेतन निश्चित करून त्यांच्या वेतनातील विसंगति दूर करावी. वेटलीज / कंत्राटदारमार्फत बेस्ट उपक्रमात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मागणी

७.खाजगी कंपन्यांमार्फत चालविण्यात येणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना "समान कामाला, समान दाम" तातडीने देण्यात यावे.