अहिल्यानगर : महाराष्ट्र राज्य मोबाईल टॉवर टेक्निकल असोसिएशनच्या कामगारांनी विविध मागणीसाठी ३१ ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शेंडी बायपास चौकात रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला असल्याची माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाशिव खेडकर यांनी दिला आहे असे वृत्त पुण्यनगरी वृत्तसंस्थेने दिले आहे.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठवाडा, विदर्भविभागातील अहिल्यानगर, जालना, संभाजीनगर, नाशिक, जळगाव, बुलढाणा, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये मोबाईल टावर नेटवर्कची सुविधा देणाऱ्या संबंधित कंपनीचे इन्फ्रास्ट्रक्कर कंपनी अल्टीअस, प्रताप कंपनीमध्ये २४ तास काम करीत असलेल्या तांत्रिक कामगारांच्या कायदेशीर मागण्यासाठी वरील कंपन्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र, कंपन्यांकडून कामगारांना न्याय मिळाला नाही.
यासंदर्भात पुण्यातील रीजनल लेबर कमिशनर यांच्याकडेही पाच ते सहा वेळा कामगार संघटनेचे प्रतिनिधी व कंपनी व्यवस्थापन यांच्यामध्ये बैठका झाल्या. मात्र तिथेही तोडगा निघाला नाही.
कामगारांच्या कायदेशीर १५ मागण्यांसाठी ११ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे बैठक झाली. त्या बैठकीमध्ये कंपनीचे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले होते. मात्र, त्या आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे ३१ ऑक्टोबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
