सोमवारपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा
अहिल्यानगर : महाराष्ट्र राज्य मोबाईल टॉवर टेक्निकल एम्प्लॉइज असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील सर्व मोबाईल टॉवर तांत्रिक कर्मचाऱ्यांनी एकमुखाने पगार वाढ, बोनस आणि सुट्ट्यांच्या मोबदल्याची मागणी केली आहे. सोमवार पर्यंत (दि.१९) मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
मराठवाडा विभागातील १० जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या आयडिया कंपनीची इनफास्ट्रक्चर कंपनी, अल्टीअस, पीटीपीएल अशा विविध कंपन्यांतील टॉवर तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी पुण्यातील लेबर कमिशनर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र चर्चेनंतरही वेतनवाढीबाबत ठोस निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
संघटनेचे अध्यक्ष सदाशिव खेडेकर, उपाध्यक्ष किशोर साठवणे, सचिव समीर शेख, कायदेशीर सल्लागार ॲड. श्रीरंग गिते, सोपान शिंदे, रवी काकडे, बाबासाहेब गायकवाड, शामसुंदर जाधव, अश्फाक शेख, नारायण पाटील, किरण निकम यांनी सांगितले की, मागील काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना योग्य वेतनवाढ दिलेली नाही. उलट वाढत्या कामाच्या ताणामुळे आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना दरमहा मिळणाऱ्या पेमेंटमध्ये ५०० ते ६००० रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. हे अत्यंत अन्यायकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, वर्ष २०२५ मधील सर्व लिव्ह (सुट्टी) व नॅशनल हॉलिडेजचे ११ हजार ४०० इतके पेमेंट अद्याप कर्मचाऱ्यांना दिले गेलेले नाही.
ही थकबाकी सोमवारपर्यंत अदा न केल्यास, राज्यभरातील सर्व मोबाईल टॉवर कर्मचाऱ्यांकडून काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
संघटनेच्या मते, पुणे लेबर कमिशनर यांच्या हस्तक्षेपानंतरदेखील कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे आता असोसिएशनकडून संघटितपणे सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन छेडले जाणार आहे. या आंदोलनाचा परिणाम अहिल्यानगर, जळगाव, जालना, बीड, हिंगोली, लातूर, परभणी, औरंगाबाद, बुलढाणा, नांदेड अशा जिल्ह्यांतील मोबाईल नेटवर्कवर होऊ शकतो, असा इशारा संघटनेने दिला आहे.
