८व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजूरी, ५० लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा

मुंबई: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवार दि. २८ ऑक्टोबर रोजी ८व्या वेतन आयोगाला मंजूरी दिली आहे. यामुळे तब्बल ५० लाख केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेंशनधारकांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची माहिती देताना सांगितलं कि, "आठवा वेतन आयोग (8th Pay Commission) १८ महिन्यांच्या आत शिफारसी सादर करेल आणि तो १ जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची शक्यता आहे."

केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला (8th Pay Commission) मंजूरी देऊन जवळपास दहा महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतर, अखेर आज आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निवेदनानुसार या आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई असतील. तर प्राध्यापक पुलक घोष हे सदस्य असतील आणि पंकज जैन हे सदस्य-सचिव असतील.

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आठव्या वेतन आयोगाकडून (8th Pay Commission) आलेल्या शिफारशींच्या आधारे वेतन आणि पेंशन वाढ २०२७ पासून लागू होण्याची शक्यता आहे. मात्र या शिफारशी १ जानेवारी २०२६ पासून प्रभावी मानल्या जातील.