कामगार मृत्‍युप्रकरणी तातडीने अहवाल द्या

पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये तीन कामगारांचा झालेला मृत्यू हा प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने पुणे जिल्‍हाधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्‍त, पोलिस आयुक्‍त आणि बीएसएनएलचे मुख्य व्यवस्थापक यांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच घटनेचा तपशील व अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत.याबाबत ॲड. सागर चरण यांनी अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार केली होती. तसेच 'सकाळ'नेही वृत्त दिले होते. 

     त्‍याची दखल घेऊन अनुसूचित जाती आयोगाचे संचालक कुमार नित्‍यानंद यांनी वरील नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसांमध्ये नमूद केले आहे की, पिंपरीत कामगारांचा मृत्‍यू होण्याची घटना घडलेली आहे. त्‍याची दखल आयोगाने घेतली आहे. घटनेचा तपशील व अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या नोटिशीनुसार संबंधित विभागांनी मृत कामगारांची नावे, अपघाताचे कारण, घटनास्थळी केलेली कार्यवाही, एफआयआर नोंद, अटक तसेच पीडित कुटुंबाला दिलेली मदत याबाबत संपूर्ण माहिती तीन दिवसांत सादर करणे आवश्यक आहे. निर्धारित वेळेत अहवाल न दिल्यास आयोग भारताच्या संविधानातील कलम ३३८ नुसार अधिकारांचा वापर करून थेट कारवाई करू शकतो, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

     दरम्‍यान, कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी निगडी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणी सखोल चौकशी करून तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मृत मजुरांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ३० लाख रुपये इतकी नुकसान भरपाई द्यावी. प्रत्येकी एका पात्र व्यक्तीला नोकरीवर सामावून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

गुन्हा दाखल नाही

लखन अश्रुबा धावरे, साहेबराव संभाजी गिरशेटे व दत्तात्रेय विजयकुमार व्हनाळे या तीनही मृत कामगारांचा शवविच्छेदनाचा अहवाल राखून ठेवण्यात आला आहे. ही घटना घडून तीन दिवस उलटल्यानंतरही निगडी पोलिस ठाण्यात अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेश बनसोडे म्हणाले, ''सध्या बीएसएनएलच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरू आहे. तसेच मृत तीनही कर्मचाऱ्यांचा शवविच्छेदन अहवाल राखून ठेवण्यात आला आहे.''