'ट्रॅक' कंपनीविरोधात कामगारांचा 'चड्डी मोर्चा' !

सिडको : औद्योगिक वसाहतीमधील 'ट्रॅक कंपोनंट्स' कंपनीकडून स्थानिक कामगारांवर होत असलेल्या अन्यायकारक व मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणीत मार्शल संघटित-असंघटित कामगार युनियनने 'चड्डी मोर्चा' सुरू केला आहे. या मोर्चाची सुरवात सोमवारी (ता. २) कामगार उपायुक्त कार्यालय येथून झाली. मोर्चा थेट मंत्रालय, मुंबईकडे कूच करीत आहे. सायंकाळी हा मोर्चा वाडीवऱ्हेपर्यंत पोचला होता असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.

    आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत खरात यांनी केले आहे. स्थानिक कामगारांना अवहेलना करून बाहेरून मजूर मागवणे, कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करणे, असे प्रकार सातत्याने सुरू आहेत. एवढंच नव्हे तर युनियनशी संबंधित कामगारांवर वैयक्तिक आकसाने कारवाई केली जात आहे. त्यामुळे आंदोलन करावे लागत असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

    आंदोलनात शहरातील विविध कामगार संघटना, सामाजिक कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत मोर्चा वाडीवऱ्हेपर्यंत पोचला आहे. कामगार संघटनेने इशारा दिला आहे, की प्रशासनाने मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर पुढील काळात मुंबई मंत्रालयाबाहेर तीव्र आंदोलन छेडले जाईल.

प्रमुख मागण्या

कंत्राटी कामगारांना कायदेशीर सुरक्षा मिळावी, स्थानिक कामगारांवर अन्याय करणाऱ्या ट्रॅक कंपनीचे बेकायदेशीर कंत्राट रद्द करावे, अतिक्रमणाची तत्काळ कारवाई करावी, अनधिकृत पार्किंग व वृक्षतोडीविरुद्ध कारवाई करावी, युनियन सदस्यांना पूर्वसूचना न देता कामावरून कमी करणे थांबवावे व सर्व कामगारांना कायम करावे, अपघातांची चौकशी करून जबाबदारांवर गुन्हे दाखल करावेत, कंपनीतील बेकायदेशीर कामकाज तत्काळ थांबवावे.