रांजणगाव गणपतीः रांजणगाव गणपती येथील पंचतारांकित रांजणगाव औद्योगिक वसाहत ता. शिरुर येथील महाराष्ट्र पॉवर एनव्हायरो पॉवर लिमिटेड (एमईपीएल) या कंपनीतून निमगाव भोगी गावच्या हद्दीत पडणाऱ्या दूषित, रसायनयुक्त व घातक पाण्यामुळे परिसरातील पाण्याचे स्त्रोत दूषित होऊन जमिनी नापिक झाल्याच्या स्थानिक नागरिक व ग्रामस्थांच्या तक्रारीच्या पाश्वभूमीवर ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी गुरुवारी, (दि.15) परिसराला भेट देऊन पाहणी केली असे वृत्त पुणे प्राईम न्यूज वृत्तसंस्थेने दिले आहे.
पवार यांनी उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार डॉ.अमोल कोल्हे, माजी आमदार अॅड अशोक पवार, सूर्यकांत पलांडे, विकास लवांडे, देवदत्त निकम, राहुल पाचर्णे, शेखर पाचुंदकर, उषा बढे,वाल्मिकराव कुरुंदळे, सतिश पाचंगे, राहुल गवारे, विश्वास ढमढेरे, शशिकांत दसगुडे, बापूसाहेब शिंदे, आबासाहेब सरोदे, दादा पाटील घावटे आदिसह या परिसराला भेट देऊन ग्रामस्थ व शेतकरी यांच्या समस्या जाणून घेतल्या. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे, एमआयडीसीचे मुख्य अभियंता नितीन वानखेडे, अभियंता संजय कोतवाड, प्रादेशिक अधिकारी अर्चना पठारे, गटविकास अधिकारी महेश डोके, निमगावच्या सरपंच ज्योती सांबारे, माजी सरपंच अंकुश इचके, संजय पावशे, उत्तम व्यवहारे, सचिन सांबारे, कर्डेलवाडीच्या सरपंच लता कर्डीले आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.
गावातील तलाव आणि कंपनीच्या मागील बाजूस जेथे रसायनयुक्त पाण्यामुळे दुर्गधी पसरली आहे. या भागाची पवार यांनी स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांसह पाहणी केली. यावेळी पाहणी व आढावा बैठकीत शेतकरी व ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी ज्येष्ठ नेते पवार म्हणाले कि, येथील प्रदूषणाचा मुद्दा खासदार कोल्हे यांनी संसदेत मांडला. आम्ही सर्व या प्रश्नासाठी खासदार कोल्हे यांच्यासमवेत आहे. कंपनीच्या दूषित पाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना फार मोठी किंमत मोजावी लागत आहे. या परिसरातील नागरिकांचे एमआयडीसीमुळे स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला असून, आर्थिक जीवनमान उंचावले आहे. विकासासाठी उद्योगधंदे गरजेचे आहेत, परंतू स्थानिक शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे प्रकल्प नको, अशी भूमिका पवार यांनी मांडली.
तसेच येथील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पुढील 15 दिवसात शासनाने मुख्यमंत्री फडणवीस, उद्योगमंत्री सामंत व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमवेत स्थानिक शेतकऱ्यांची बैठक घेण्यात यावी. कंपनीकडून झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणार आहे. बाधित शेतरकऱ्यांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ.
उद्योगमंत्री सामंत म्हणाले, कंपनीने प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या सूचनांचे तातडीने पालन करावे. या प्रश्नात उद्योगमंत्री म्हणून अनेकदा लक्ष घातले. या बाधित शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नसून, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच यापुढे निर्णय घेऊ. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळेच राज्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास झाला असून, शासन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कटीबद्ध आहे. शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही यासाठी शासन प्रयत्न करेल.
खासदार डॉ.कोल्हे यांनी या कंपनीच्या प्रदूषणाबाबत संसदेत आवाज उठविल्यानंतर, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त पथकाने कंपनीला भेट देत प्रतिबंधात्मक सूचना दिलेल्या आहेत. प्रदूषण मंडळाने केलेल्या सूचनांचे पालन न केल्यास कंपनी सुरु राहण्याचा अधिकार नाही.अटी व शर्ती पुर्ण न करता हा प्रकल्प चालविला जात असेल तर तो नागरिकांच्या आरोग्याशी खेळ असून, हा खेळ आम्ही कुठल्याही स्थितीत चालू देणार नाही. सूत्रसंचालन प्रकाश थोरात यांनी केले. तर आभार पांडुरंग थोरात यांनी मानले.