महापारेषण कंपनीत कार्यरत नियमित मंजूर रिक्त पदांवर कार्यरत वीज कंत्राटी कामगारांना विविध भरती प्रक्रियेत १० गुणांची अतिरिक्त सवलत आणि वयोमर्यादेत ४३ वर्षांपर्यंत शिथिलता मिळावी, तसेच वायरमन ट्रेडचे उमेदवारांना नोकरीसाठी समान संधी मिळावी यांसारख्या मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने १ मे कामगार दिनी आंदोलन पुकारले होते.
तथापि, पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांनी आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. त्यामुळे संघटनेने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
मुंबई पोलीस उपायुक्त मा. श्री. मनीष कलवानिया यांनी, लवकरच ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वीज कंत्राटी कामगार संघाचे शिष्टमंडळ चर्चा करेल, असे आश्वासन दिले, अशी माहिती प्रदेश सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर संघाचे शिष्टमंडळ – श्री. सचिन मेंगाळे व श्री. शुभम राठोड – यांनी महापारेषणचे संचालक (मानव संसाधन) मा. सुगत गमरे आणि मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मा. भरत पाटील यांच्याशी चर्चा केली. कंत्राटी कामगारांना वयोमर्यादेत सवलत देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली असून वायरमन ट्रेडच्या उमेदवारांनाही संधी देण्याचा विचार केला जाईल, असे श्री. गमरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री. निलेश खरात यांच्यावर पुणे पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई केल्यामुळे ते आंदोलनात सहभागी होऊ शकले नाहीत, अशी माहिती उपमहामंत्री श्री. राहुल बोडके यांनी दिली.
यावेळी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संघटनेचे सरचिटणीस सचिन मेंगाळे , उप सरचिटणीस राहुल बोडके, उमाकांत गिरी, नंदन राऊत, सुधीर शिर्के, विजय पडवळ, रोहित तांडेल, सुधीर शिवकर, कल्पेश म्हात्रे, संदीप गायकवाड इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.