सोलापुरात टॉवेल कारखान्यास भीषण आग; मालकाच्या कुटुंबीयांसह आठजणांचा मृत्यू

सोलापूर : सोलापुरात अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये एका टॉवेल कारखान्यास अचानकपणे लागलेल्या आगीत कारखान्याच्या मालक आणि कामगारांच्या कुटुंबातील आठजणांचा होरपळून मृत्यू झाला. कारखाना मालकासह त्याच्या कुटुंबातील चौघांचे मृतदेह कारखान्यात वरच्या मजल्यावरील घरात सापडले . अन्य चौघे मृत कामगार असून त्यात दोन महिला आहेत. ही आग एवढी भीषण आहे की अग्निशमन दलास आग नियंत्रणात आणायला बारा तासांपेक्षा जास्त वेळ लागला. आगीचे निश्चित कारणही समजू शकले नाही. आग आटोक्यात आणताना अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्यासह दोन जवानही किरकोळ जखमी झाले असे वृत्त लोकसत्ता वृत्तसंस्थेने दिले आहे.

    कारखान्याचे मालक हाजी उस्मान मन्सुरी (वय ८७) यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अनस मन्सुरी (वय २४), शिफा मन्सुरी (वय २४) आणि त्यांचा चिमुकला मुलगा युसूफ मन्सुरी (वय एक वर्ष) यांचा समावेश आहे. याशिवाय आयेशा बागवान (वय ४५) व हिना बागवान (३८) या दोन महिला आणि मेहताब बागवान (वय ५१) आणि सलमान बागवान (वय १८) या चार कामगारांचाही आगीत होरपळून मृत्यू झाला.

     अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये सेंट्रल टेक्सटाइल नावाच्या टॉवेल कारखान्यात पहाटे पावणेचारच्या सुमारास अचानकपणे आग लागली आणि पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. यात बागवान कुटुंबीयांशी संबंधित एका महिलेसह तीन कामगारांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत कारखान्याच्या मालकाचे कुटुंबीयही अडकले असून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरूच होते. शेवटी बारा तासांच्या प्रयत्नांनंतर मालकाच्या कुटुंबीयांसह एक महिला कामगार अशा पाच जणांचे मृतदेह मालकाच्या घरातील खोलीत सापडले.

    हाजी उस्मान मन्सुरी यांच्या मालकीच्या सेंट्रल टेक्सटाइल कारखान्यात सुमारे २२५ कामगार काम करतात. उत्पादित टॉवेलसह त्यासाठी लागणारे सूत, दोरी, रसायन, कागदी पुठ्ठे आदी माल कारखान्यात मोठ्या प्रमाणावर होता.‌ कारखान्याचे मालक माजी उस्मान मन्सुरी हे कुटुंबीयांसह कारखान्यात वरच्या मजल्यावर राहतात.‌ आगीत मालकासह मन्सुरी कुटुंबातील पाच ते सहाजण अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन यंत्रणेकडून नेटाने प्रयत्न सुरू होते.‌ या कुटुंबीयांचा आवाज दुपारी उशिरापर्यंत बाहेर ऐकू येत होता.‌ अग्निशमन यंत्रणेचे प्रयत्न अपुरे पडले. बचाव कार्य करताना सोलापूर महानगरपालिका अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी राकेश साळुंखे यांच्यासह अन्य दोन जवान किरकोळ भाजून जखमी झाले.

    यासंदर्भात साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे पावणेचारच्या सुमारास सेंटर टेक्सटाइल टॉवेल निर्मिती कारखान्यात आग लागल्याची वर्दी अक्कलकोट रोड एमआयडीसी मधील महापालिका अग्निशमन दलाला मिळताच पातळीने पाण्याचा बंब दुर्घटनास्थळी धावून गेला. परंतु तोपर्यंत कारखान्यात लागलेल्या आगीने भीषण स्वरूप धारण केले होते. त्यामुळे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या सर्व केंद्रांचे पाण्याचे बंब मागविण्यात आले. याशिवाय एनसीटीसी प्रकल्पासह चिंचोली एमआयडीसी, तसेच अक्कलकोट व पंढरपूर येथूनही पाण्याचे बंब मागविण्यात आले. सुमारे दहा बंबांनी ६० पेक्षा जास्त फे-या करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीचे स्वरूप जास्त भीषण होते.‌

     यातच कारखान्याच्या सभोवतालच्या मोकळ्या जागेत पत्र्याचे शेड असल्यामुळे अग्निशमन दलाच्या यंत्रणेला कारखान्यात प्रवेश करताना अडचणी आल्या. त्यामुळे उंच शिडी आणि एरियल लॅडर वापरून कारखान्याच्या उंच इमारतीतून बाधित व्यक्तींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. वाढलेल्या आगीसह धुराचा मुकाबला करीत आत शिरताना अग्निशामक दलाच्या जवानांना स्वतःचेही संरक्षण करावे लागले.

    दरम्यान, भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी दुर्घटनाग्रस्त कारखान्यास भेट दिली. त्यांच्याकडे बाधित कामगारांच्या नातेवाईकांनी अग्निशमन यंत्रणेसह आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला वेळीच संपर्क साधूनही यंत्रणा पोहोचायला विलंब झाल्याची तक्रार केली.‌ यासंदर्भात पालिका अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी राकेश साळुंखे यांनी, तक्रारीवर थेट भाष्य करण्यास नकार दिला.‌ मात्र सुरूवातीला माहिती मिळताच क्षणी अक्कलकोट रोड एमआयडीसी अग्निशमन यंत्रणेचा पाण्याचा बंब तात्काळ पोहोचला. प्रत्यक्षात आग भीषण होती. कारखान्याच्या सभोवतालच्या मोकळ्या जागेत पत्र्याचे शेड उभारल्यामुळे बचाव कार्य करताना अडचणी आल्या, असे साळुंखे यांनी सांगितले.