'जिंदाल पॉलीफिल्म्स'ला कारखाना बंद करण्याची नोटीस

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्म्स कारखान्यास बुधवारी पहाटे लागलेली भीषण आग १०० तासानंतर आटोक्यात आल्यानंतर औद्योगिक सुरक्षा विभागाने आता हा प्रकल्प बंद करण्याची नोटीस बजावली आहे. अडीच वर्षात कारखान्याला आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. नुकत्याच घडलेल्या घटनेची औद्योगिक सुरक्षा विभागाकडून चौकशी सुरू आहे असे वृत्त लोकसत्ता वृत्तसंस्थेने दिले आहे.

      अतिज्वलनशील कच्च्या मालामुळे भडकलेल्या जिंदाल पॉलीफिल्म्स कारखान्यातील आगीवर रविवारी नियंत्रण मिळाले. आग नियंत्रणात आणण्यासाठी एनडीआरएफच्या पथकासह आसपासच्या जिल्ह्यांतून आणि मुंबईतील खासगी कंपन्यांची अग्निशमन दलांना पाचारण करावे लागले होते. कारखान्यात 'प्रॉपेन'नामक रासायनिक पदार्थाची टाकी आहे. आगीची धग तिथपर्यंत पोहोचून अनर्थ घडू नये म्हणून सभोवतालचा एक किलोमीटरचा परिसर रिक्त करावा लागला होता. 

     ज्वलनशील कच्चा माल, रसायनांमुळे आगीने संपूर्ण कारखान्याला वेढा घातला. पहिल्या दिवशी वितळलेल्या प्लास्टिकवर पाय पडून दोन कामगार जखमी झाले होते. कारखान्यात प्रथम भंगार साहित्याला आग लागली आणि ती इतरत्र पसरल्याचा यंत्रणेचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, जिंदाल पॉलीफिल्म्सला कारखाना बंद करण्याची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती औद्योगिक सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

यापूर्वी नियमांचे उल्लंघन

अडीच वर्षांपूर्वी आगीच्या दुर्घटनेत तीन कामगारांचा मृत्यू तर, २२ कामगार जखमी झाले होते. या दुर्घटनेच्या चौकशीत कारखान्याकडून सुरक्षासंबंधी नियमांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणी कारखान्याविरुद्ध येथील न्यायालयात खटला दाखल आहे. पुन्हा आगीचा तसाच प्रकार घडल्याने सुरक्षा नियमावलीच्या पालनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून त्यातून अनेक बाबी स्पष्ट होतील असे संबंधित यंत्रणेकडून सांगण्यात आले.