नागपूर : नागपूर जिल्ह्यातील उमरेड एमआयडीसी परिसरातील एका ॲल्युमिनियम कंपनीत शुक्रवारी संध्याकाळी मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ११ जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे. स्फोट झाला त्यावेळी कंपनीत १५० कामगार कामावर होते. स्फोटानंतर सर्वांनी बाहेर धाव घेतल्यामुळे अनेकांचे जीव वाचले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. कंपनीतील हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्फोटानंतर निर्माण झालेले धुरांचे लोळ एक किलोमीटरपर्यंत दिसत होते.
कामगार जीव मुठीत घेऊन पळाले
नागुपरातील उमरेड एमआयडीसीत एमएमपी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत अल्युमिनियम फॉइल आणि पावडर तयार केली जाते. या कंपनीत शुक्रवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे काम सुरू होते. १५० कामगार काम करत होते. संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास जोरदार स्फोट झाला. या स्फोटानंतर भीषण आग लागली. स्फोटामुळे येथे काम करणाऱ्या काही कामगारांचे कपडे अंगावरच जळाले. स्फोटानंतर कामगारांनी बाहेर धाव घेतली. आपला जीव मुठीत घेऊन बाहेर पळत सुटले. यामुळे अनेक कामगार थोडक्यात बचावले. पण काही जण अडकले. त्यात अकरा जण जखमी झाले.
कंपनीतील स्फोटाची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने रुग्णावाहिका बोलवण्यात आली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरा जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आणि पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि बचाव कार्याचा आढावा घेतला.
स्फोटाच्या कारणाचा शोध सुरु
दरम्यान या स्फोटामुळे कंपनीच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कामगारांच्या मनात प्रचंड दहशत पसरली आहे. आता स्फोटाचे कारण शोधण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाने तपास सुरू केला आहे. नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.