आयुध निर्माणी कामगारांचे ठिय्या आंदोलन मागे

भंडारा : भंडारा आयुध निर्माणीती असंघटीत कामगारांनी सुरक्षा किटच्या मागणीसाठी आंदोलन पुकारले होते.  आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी मागण्या मंजूर करण्याचे आश्वासन मिळाल्याने कामगारांनी आंदोलन मागे घेतले असे वृत्त दैनिक पुढारी वृत्तसंस्थेने दिले आहे.

    आयुध निर्माणी भंडारा येथे २४ जानेवारीला झालेल्या स्फोटात ८ कर्मचारी ठार तर ५ कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. हा स्फोट इतका भयंकर होता की त्या घडलेल्या घटनेला निर्माणीतील कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयांचे मनात धडकी भरली गेली आहे. दारुगोळा उत्पादित या निर्माणीत केंद्र सरकारचे सुरक्षा विभागातील कर्मचारी, आयुध विर, ट्रेड अप्रेंटेशिप प्रशिक्षणार्थी व कंत्राटी कामगार अशा कर्मचाऱ्यांना अपुऱ्या सेफ्टी किट, जुन्या काळातील मशिनरीवर काम करवून घेतले जात आहे.

     या निर्माणीत नियमित कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने निर्माणी प्रशासन बहुतांश कामे कंत्राटदाराकडून कामाचे टेंडर पद्धतीने कामे देवून रोजंदारीवर डेंजर बिल्डिंगची कामे, दारूगोळा मालाची ने-आण व इतर डेंजर बिल्डिंगमधील कामे करवून घेतले जाते. २४ जानेवारीला झालेल्या अपघातानंतर कामगारांमध्ये सेफ्टी किट, तथा डेंजर बिल्डिंगमध्ये काम करताना सर्व साहित्य मिळावे व एखादा अपघात झाल्यास, कुटुंबीयांना योग्य मोबदला मिळावा याकरिता तसेच कामगारांना व त्यांच्या परिवारांना ईसीएस अंतर्गत शासकीय अथवा खासगी रुग्णालयात सोय उपलब्ध व्हावी या सर्व मागण्यांसाठी असंघटित कामगारांनी दोन दिवसांपासून काम बंद आंदोलन पुकारले होते.

      २१ फेब्रुवारीला खासगी कंपनीचे पर्यवेक्षक तथा व्यवस्थापकांसोबत चर्चा करून या सर्व विषयावर तोडगा काढण्यात आला व यापुढे काम करणाऱ्या सर्व कामगारांना योग्य सुरक्षा किट देण्याचे आश्वासन व ईसीएसच्या योजनेचे लाभ मिळवून देण्यासाठी फॅमिली कार्ड बनवून देण्याचे आश्वासन दिल्यामुळे सर्व कामगारांनी आंदोलन मागे घेतले. तत्काळ आजपासूनच कामावर ते रुजू झाले आहेत.