पुणे : कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, आरोग्य, वेतनवाढ अशा विविध मागण्यांसाठी 'जियांग्यिन युनिपॉल व्हॅक्युम कास्टिंग इंडिया प्रा. लि.' या कंपनीतील १६४ कामगारांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. ही कंपनी चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील पिंपळे जगताप येथे आहे. संपाची कायदेशीर नोटीस आणि कारणे याबाबतची नोटीस कंपनीला दोन जानेवारी रोजी देण्यात आली आहे. 'युनिपॉल इंडिया कामगार संघटने'कडून ही संपाची हाक देण्यात आली आहे असे वृत्त महाराष्ट्र टाइम्स वृत्तसंस्थेने दिले आहे.
कंपनीत विविध विभागांत यंत्रसामग्री दाटीवाटीने बसवण्यात आली आहे. कास्टिंग विभागात उत्पादन प्रक्रियेतून उच्च तापमान निर्मित होते. त्यामुळे कामगारांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, या
विभागात ताजी खेळती हवा असावी, कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेतून निर्माण होणारी धूळ, धूर निर्माण होतो. त्यामुळे कामगारांना योग्य दर्जाचा मास्क, हातमोजे द्यावेत, सुरक्षा साधने पुरवावीत, कंत्राटी कामगारांना अतिकालीन कामाचे वेतन दिले जात नाही. वेतनवाढ आणि इतर मागण्यांचे पत्र संघटनेकडून गेल्या वर्षी १८ मार्चला व्यवस्थापनाला सादर केले. मात्र, अद्याप दखल घेण्यात आलेली नाही.
कामगार आयुक्तालयाकडे तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर अहवालदेखील प्राप्त झाला; मात्र अद्याप कारवाई झालेली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर २० जानेवारीपासून संपावर जाण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे, अशी माहिती संघटनेचे मारुती जगदाळे यांनी दिली.