पिंपरी-चिंचवड : "पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील कामगारशक्ती हे एकात्मतेचे प्रतीक आहे,'' असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप गांधलीकर यांनी केले. निमित्त होते, देशभक्तीपर काव्य संमेलनाचे राज्य सरकारच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे चिंचवड येथील कामगार कल्याण केंद्रात कौमी एकता सप्ताहानिमित्त आयोजित कविसंमेलनात अध्यक्षस्थानावरून गांधलीकर बोलत होते. ज्येष्ठ कवी आय. के. शेख, उद्यमनगर कामगार कल्याण केंद्र संचालक प्रदीप बोरसे उपस्थित होते असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.
राष्ट्रीय एकतेवर प्रबोधनपर कविता सादर झाल्या. सुरेश कंक (काया झिजवू देशासाठी शपथ घेऊ या तिरंग्याची.. वंदे मातरम्), तानाजी एकोंडे (द्रौपदी सीतेप्रमाणे तूही आता सज्ज हो सर्व अस्त्र घेऊन...), शोभा जोशी (अंगणात भुंगा करतोय दंगा गुमगुम म्हणतो गाणी...), सुहास घुमरे (आजच्या भाकरीसाठी उद्याच्या चंद्रकोरीसाठी झपाझप पावले पडत होती कारखान्याच्या दिशेने...), शामराव सरकाळे (एकमेका साह्य करू मानवतेची गुढी उभारू...), मुरलीधर दळवी (माझ्या भारत देशा...), रेवती साळुंखे (स्वातंत्र्य द्या हो तिला ती अजूनही आहे बंदिस्त...) यांच्यासह फुलवती जगताप, हेमंत जोशी यांनी कविता सादर केल्या. गांधलीकर म्हणाले, ''देशातील विविध भागातून तसेच महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातील वेगवेगळ्या जात, धर्म, पंथाचे कामगार चरितार्थासाठी पिंपरी-चिंचवड या उद्योगनगरीत स्थायिक झाले आहेत. आपल्या श्रमातून अन् घामातून त्यांनी या परिसराला आणि पर्यायाने महाराष्ट्राला देशात अग्रेसर बनविले. त्यामुळे येथील समृद्धीत कामगारशक्तीचे मोठे योगदान आहे.'' सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले. अश्विनी दहिभाते यांनी आभार मानले.