युनिपॉल इंडीया कामगार संघटना पदाधिकारी यांना संरक्षित कामगार (Protected Employee) म्हणून मिळाली मान्यता

पुणे : पिंपळे जगताप, ता. शिरुर येथील युनिपॉल इंडीया कामगार संघटना पदाधिकारी यांना सहायक कामगार आयुक्त तथा समेट अधिकारी द. दा. पवार यांनी संरक्षित कामगार (Protected Employee) म्हणून मान्यतेचा आदेश दिला.

      वरील संघटनेने कंपनी व्यवस्थापनास संरक्षित कामगार (Protected Employee) म्हणून मान्यता देण्यासाठी पत्र दिले होते. परंतु व्यवस्थापनाने याची दखल न घेतल्याने सदर प्रकरण कामगार उपायुक्त कार्यालय याठिकाणी समेट कार्यवाहीत दाखल करण्यात आले. सदर प्रकरणी कामगार कार्यालय येथे बैठकी घेण्यात आल्या. त्यानंतर दि.१ ऑक्टोबर २०२४ रोजी सहाय्यक कामगार आयुक्त यांनी सदर कामगारांना संरक्षित कामगार (Protected Employee) म्हणून मान्यतेचा आदेश दिला.

    युनिपॉल इंडीया कामगार संघटनेचे अध्यक्ष शरद हरिभाऊ लोंढे, उपाध्यक्ष माधव शिवाजी फरांदे, जनरल सेक्रेटरी दत्तात्रय महादेव निळूगडे, सह सेक्रेटरी निलेश प्रकाश सुर्वे, सदस्य प्रवीण गंगाधर रासकर यांना सरंक्षित कामगार (Protected Employee) म्हणून मान्यता देण्यात आली. 

     सदर आदेश जाहीर केले बाबत सहायक कामगार आयुक्त तथा समेट अधिकारी तथा समेट अधिकारी द. दा. पवार यांचे संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले.      

संरक्षित कामगार (Protected Employee) कोण :

ज्या आस्थापनेत रजिस्टर संघटना आहे त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना संरक्षित कामगार म्हणून मान्यता मिळते.

सरंक्षित कामगार (Protected Employee) लाभ :

  • चालू असलेल्या सेवाशर्ती मध्ये कोणताही बदल व्यवस्थापन कामगार आयुक्त यांच्या लेखी परवानगीशिवाय करू शकत नाही.
  • परवानगी शिवाय बढती तसेच पदोन्नती करता येणार नाही.
  • कामगार आयुक्त कार्यालयाकडून परवानगी शिवाय कारवाई करण्यास मनाई आहे.

सरंक्षित कामगार (Protected Employee) मान्यतेसाठीची पद्धत :

  • दरवर्षी ३० सप्टेंबर च्या अगोदर संरक्षित कामगार यादी कंपनी व्यवस्थापनास सादर करणे बंधनकारक आहे.
  • संघटनेच्या वतीने संरक्षित कामगार यादी कंपनी व्यवस्थापनाला दिलेल्या तारखेपासून पंधरा दिवसात कंपनीने मान्यता देणे आवश्यक आहे.
  • कंपनी व्यवस्थापनाने १५ दिवसात मान्यता न दिल्यास कामगार उपायुक्त कार्यालयात समेटासाठी अर्ज करावा.
  • अर्ज केल्यानंतर कामगार उपायुक्त व्यवस्थापना सोबत बैठक घेऊन मान्यता देतात.