श्रमिकांच्या कल्याणासाठी आणि देशातील रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी सरकार वचनबद्ध
केंद्रीय श्रम आणि रोजगार आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय ट्रेड युनियन ऑर्गनायझेशन (सिटीयूओ) च्या प्रतिनिधींसोबत (दि.२८ ऑगस्ट) नवी दिल्ली येथे गोलमेज बैठक झाली. केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते.
श्रमिक संघटनांसोबतच्या या प्रास्ताविक बैठकीतील चर्चेचा केंद्रबिंदू नवीन प्रस्तावित रोजगार संलग्न प्रोत्साहन (ईएलआय) योजना हा होता, ज्याची घोषणा अलीकडील केंद्रीय अर्थसंकल्पात अन्य श्रमिक कल्याणाभिमुख उपायांव्यतिरिक्त करण्यात आली होती.
सिटीयूओ ला संबोधित करताना,डॉ.मांडवीय यांनी देशाच्या आर्थिक वाढीचा आणि विकासाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रमशक्तीच्या कल्याणासाठी सरकारच्या अतूट बांधिलकीचा पुनरुच्चार केला. ते पुढे म्हणाले की कामगार संघटना आमच्या कामगारांचा आवाज आहेत आणि त्यांचा दृष्टिकोन केवळ प्रभावीच नाही तर न्याय्य आणि सर्वसमावेशक धोरणे तयार करण्यासाठी अनमोल आहे.
बैठकीत प्रस्तावित रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेचे सादरीकरणही करण्यात आले.
डॉ.मनसुख मांडवीय यांनी ईएलआय योजना तयार करण्याबाबत कामगार संघटनांकडून सूचना मागविल्या.ईएलआय योजना अधिक रोजगार निर्मितीकरिता व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच आपल्या देशातील तरुणांना अर्थपूर्ण आणि शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तयार करण्यात आली आहे यावर त्यांनी भर दिला.
सर्व हितधारकांच्या हिताची खात्री करण्यासाठी कामगार संघटनांचे योगदान मौल्यवान आहे यावर बैठकीदरम्यान डॉ. मांडवीय यांनी जोर दिला.
विविध सिटीयूओ च्या प्रतिनिधींनी या योजनेबद्दल तसेच सरकारने राबवलेल्या अन्य श्रमिक कल्याण उपायांबद्दल त्यांचे दृष्टिकोन सामायिक केले. डॉ. मांडवीय यांनी कामगार संघटनांना आश्वासन दिले की अशा बैठका ही एक निरंतर प्रक्रिया असेल आणि निष्पक्षता, सर्वसमावेशकता आणि न्याय्य वाढीला प्रोत्साहन देणाऱ्या पद्धतीने धोरणे आणि योजना तयार करण्याची खातरजमा करण्यासाठी कामगार संघटनांचे मौल्यवान योगदान मिळविण्याची सरकार अपेक्षा करते.