नांदगाव पेठ : स्थानिक पंचतारांकित एमआयडीसीमधील गोल्डन फायबर या कंपनीने त्यांच्या परिसरात लागलेले शिवसेना प्रणित राष्ट्रीय कामगार सेनेचे फलक काढून फेकल्याची घटना 29 मे रोजी उघडकीस आली. परप्रांतीय अधिकार्यांनी स्थानिक मराठी कामगारांना डिवचण्याच्या या प्रकाराने स्थानिक कामगार आक्रमक झाले होते; मात्र पोलिस उपायुक्त सागर पाटील यांच्या मध्यस्थीने वाद निवळल्या गेला. सदर फलक त्याच ठिकाणी लावून या वादावर पडदा टाकण्यात आला असे वृत्त तरुण भारत नागपूर वृत्तसंस्थेने दिले आहे.
कामगारांसाठी झटणारी तसेच कामगारांना त्यांचे न्याय व अधिकारासाठी सातत्याने लढा देणारी शिवसेना प्रणित राष्ट्रीय कामगार सेना गेल्या दीड वर्षांपासून सक्रिय आहे. गोल्डन फायबर या कंपनीमध्ये मध्यंतरी कामगार व व्यवस्थापन वाद निर्माण झाल्यावर राष्ट्रीय कामगार सेनेची याठिकाणी स्थापना झाली होती. त्यानंतर निवडणुकीमध्ये राष्ट्रीय कामगार सेनेचे पाच सभासद निवडून सुद्धा आले होते. त्यामुळे गोल्डन फायबर कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या काही अंतरावर कामगारांनी सेनेचे फलक लावलेले होते.
याठिकाणी परप्रांतीय अधिकारी असलेले रावत आणि प्रसाद हे दोन्ही अधिकारी स्थानिक मराठी कामगारांना डावलण्याचा तसेच त्यांना मानसिक त्रास देऊन कामावरून कमी करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा मराठी कामगारांचा आरोप आहे. अधिकार्यांच्या या मनमानीला कंटाळून कामगारांनी एकतेचे दर्शन दाखवले. त्यामुळे रावत व प्रसाद यांनी काही कर्मचार्यांना हाताशी धरून 29 मे रोजी राष्ट्रीय कामगार सेनेचे फलक तोडून ते फेकून दिले होते.
या प्रकाराची माहिती राष्ट्रीय कामगार सेनेचे राज्य चिटणीस वेदांत तालन, उपचिटणीस महेंद्र गाडे, जिल्हाचिटणीस प्रफुल्ल तायडे, शिवसेनेचे महानगर अध्यक्ष संतोष बद्रे यांना मिळताच त्यांनी कामगारांसह गोल्डन फायबर येथे धाव घेतली. कामगार व अधिकारी वाद निर्माण होण्याचे संकेत पोलिस उपायुक्त सागर पाटील यांना मिळताच त्यांनी लगेच आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठून कामगार व अधिकारी यांची समजूत घातली.
अधिकार्यांनी फेकून दिलेले फलक पुन्हा लावण्याच्या सूचना सागर पाटील यांनी दिल्या; तसेच याप्रकरणी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सोमवारी कामगार आयुक्त कार्यालयात बैठक घेऊन कामगारांच्या समस्या सोडविण्यात येईल असेही यावेळी पोलिस अधिकार्यांनी कामगारांना आश्वासन दिले. यावेळी शिवसेना व राष्ट्रीय कामगार सेनेचे पदाधिकारी तसेच शेकडो कामगार उपस्थित होते.
