पिंपरी : ठेकेदार, कंत्राटदार यांना सोबत निवडणुका जिंकता येत नाहीत श्रमिक आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवून त्या जिंकता येतात अशी टीका भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तसेच ज्येष्ठ कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी केली आहे.
सत्ताधारी भाजपभोवती ठेकेदार व कंत्राटदारांचे कोंडाळे जमा झाले होते. त्यामुळे कामगार, श्रमिक व समाज पक्षापासून कधी दुरावला हे पदाधिकाऱ्यांना समजलेच नाही. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. वरिष्ठ नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असा घरचा आहेर भाजपप्रणीत राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिला.
कोरोनाकाळामध्ये मजुरांची फरफट झाली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या; पण नोकरीवरून काढू नये, याचे फक्त केंद्र सरकारने अध्यादेश काढले. नोकरीवर परत घेण्यासाठी कोणतीही हालचाल केली गेली नाही. आमच्या मागण्यांसाठी आम्ही उपोषण केले; पण त्याकडे लक्षदेखील दिले गेले नाही. त्यामुळे कामगार पक्षापासून तुटत गेला. हे त्यांना समजलेदेखील नाही. ही बाब आम्ही निदर्शनास आणून दिली होती; पण आमच्याकडे बघायलाही सत्ताधाऱ्यांना वेळ नव्हता, असा आरोपही त्यांनी केला.
