डोंबिवली : एमआयडीसीत केमिकल कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात ६ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून जवळपास ३० कामगार जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. घटनास्थळी आगीच्या ज्वाळा आणि धुराचे मोठ्या प्रमाणावर लोट असल्याने बचाव कार्यात अडथळ येत आहे. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. उद्योगमंत्री उदय सामंत आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन बचावकार्याची माहिती घेतली तसेच यंत्रणेला सूचना केल्या.
डोंबिवली एमआयडीसी फेस दोन मधील अंबर केमिकल कंपनीच्या बॉयलरमध्ये दुपारी १ वाजताच्या सुमारास मोठा स्फोट झाला. डोंबिवलीत अनेक किलोमीटरपर्यंत या स्फोटाचे हादरे जाणवले. परिसरातील अनेक इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. घटना घडल्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आग नियंत्रण आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र आगीच्या ज्वाळा आणि धुराचे मोठ्या प्रमाणावर लोट असल्याने बचाव कार्यात अडथळ येत आहेत.
६ कामगारांचा मृत्यू, ३० जखमी
घटनास्थळाला भेट दिल्यानंतर आणि यंत्रणांकडून माहिती घेतल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, प्राथमिक माहितीनुसार बॉयलरमध्ये स्फोट झाल्याची माहिती आहे. या स्फोटात सध्याच्या माहितीनुसार ६ कामगार मृत्यूमुखी पडले आहेत. धूर आणि आग मोठी असल्याने मृत्यूचा नेमका आकडा सांगता येत नाही. दोन तासांनंतर चित्र स्पष्ट होईल. मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून मदत केली जाईल, कुणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही, हे मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने मी आश्वस करतो, असे उदय सामंत यांनी सांगितले.
