कामगारांच्या मृत्यूप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

विरार वसई : येथे एसटीपी प्लँटची स्वच्छता करण्यास गेलेल्य चार सफाई कामगारांचा मृत्यू झाला. ही घटना ऐन पाडव्याच्या दिवशी (दि.9 एप्रिल) वसई विरार येथे घडली. या कामगारांच्या मृत्यूप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कुटुंबीयांना दहा लाखाच्या अर्थसहाय्य द्यावे. अशी मागणी राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांनीकेली आहे.

    विरार पश्चिम येथील एसटीपी प्लँटमध्ये काम करण्यासाठी गेलेले शुभम पारकर, निखिल घाटाळ, सागर तेंडुलकर व अमोल घाटाळ अशी मृत कामगारांची नावे आहेत. पॉलीकॉम् नावाच्या कंपनीमार्फत एसटीपी प्लँटची साफसफाई करण्याचे काम सुरू असताना ही घटना घडल्याचे समजते. वास्तविक कामगारांची सुरक्षा करण्याचे काम संबंधित कंपनी ठेकेदार कामगार हा यांची जबाबदारी असताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले आहे.

    त्यामुळे संबधित मालक, ठेकेदार आणि संबधित सर्व दोषींवर सदोष मनुष्ववधाच्या गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयाचे अर्थसहाय्य करण्यात यावे.तसेच कष्टकरी कामगार अपघाती मृत्यूसाठी विमा योजना त्वरित सुरू करावी. अन्यथा कामगार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा नखाते यांनी दिला आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशन ,कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे घटनास्थळी व पोलीस स्टेशनला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. जिल्हाधिकारी कार्यालय येथे याबाबत सकारात्मक कार्यवाही करू असे सांगण्यात आले. निवेदनावर प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, मुंबई कार्याध्यक्ष अनंत कदम,माधुरी जलमुलवार ,सलीम डांगे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.