रेनबो ॲग्री इंडस्ट्रीज (Rainbow Agri. Industries Limited) येथे वेतनवाढ करार संपन्न

पुणे : लोणी काळभोर येथील मे.रेनबो ॲग्री इंडस्ट्रीज लि. पुणे (Rainbow Agri. Industries Limited)  कंपनी व्यवस्थापन आणि भारतीय कामगार सेना यांच्यामध्ये सलग सातव्या वेतनवाढीचा त्रैवार्षिक करार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते, भारतीय कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक यांच्या नेतृत्वाखाली झाला. त्यात प्रत्यक्ष १३ हजार ८०० रुपयांची घसघशीत वाढ झाली असून,हा करार १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत राहणार आहे.

    २९ फेब्रुवारी रोजी कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक अमोल केंदुळे, जनरल मॅनेजर आर. एन. शर्मा, तसेच हा करार यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या वतीने शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, कार्याध्यक्ष अजित साळवी, भारतीय कामगार सेना प्रदेश सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक, तेजस गडसुंद, नीलेश लंगोटे, युनिट प्रतिनिधी अध्यक्ष बाबासाहेब तिडके, उपाध्यक्ष अमर मुळे, जनरल सेक्रेटरी दिगंबर जगताप, सदस्य विठ्ठल अवताडे यांनी काम पाहिले.

    पोल्ट्री फीड (कोंबडी खाद्य) क्षेत्रातील आघाडीच्या मे. रेनबो ॲग्री इंडस्ट्रीज लि. कंपनीत १३ हजार ८०० रुपयांचा वेतनवाढीचा करार करण्यात आला. ॲग्रो इंडस्ट्रीज उद्योगक्षेत्रातील सर्वांत मोठ्या पगारवाढीचा हा करार असल्याने कामगारवर्गात आनंद निर्माण झाला आहे. गेल्या काही वर्षांत ॲग्रो इंडस्ट्रीज कंपन्या पोल्ट्री फीड म्हणजेच कोंबडीचे खाद्यनिर्मिती क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करू पाहत आहे. यात मे. रेनबो ॲग्रो लि. कंपनीनेदेखील विस्तार करीत वेगळी उंची गाठली आहे. करारात बफर मेडिक्लेम योजना, बोनस, वार्षिक सहलभत्ता, बूटभत्ता, मोफत कॅण्टीन सुविधा कंपनीतील कामगारांना मिळणार आहे.