कामगारांचे शोषण करणारे कायदे नको, कामगार विकासाचे कायदे हवेत

- कामगार नेते यशवंत भाऊ भोसले

नाशिक : राष्ट्रीय श्रमिक आघाडी (संलग्न नॅशनल फ्रंट ऑफ इंडियन ट्रेड युनियन) या संघटनेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्यातील कामगार नेते यशवंत भाऊ भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे

    या संदर्भात पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देताना महाराष्ट्र राज्यातील कामगार नेते यशवंत भोसले यांनी सांगितले की, सध्या सर्व उद्योगांमध्ये, कारखान्यांमध्ये, तसेच महानगरपालिका व महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक विभागामध्ये बेकायदेशीर कंत्राटी कामगारांचा वापर करून त्यांचे शोषण सुरू आहे. वास्तविक पाहता कायद्यानुसार कंत्राटी पद्धतीने काम करीत असलेल्या कामगारांना सेवेत कायम करावे, तसेच कायम कर्मचार्यांप्रमाणे त्यांना वेतन देण्यात यावे, असे कायद्यामध्ये नमूद केलेले आहे; परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी मी स्वतः कामगार नेता यशवंत भोसले नाशिक शहरात आलेलो आहे.

    त्याचप्रमाणे भोसले पुढे म्हणाले की, सध्या जे काही कामगार कायम आहेत, त्यांना बेकायदेशीरपणे कामावर कमी करणे, त्यांच्या संघटनेबरोबर चर्चा न करता वेतनवाढीच्या करारास विलंब लावणे, संघटना स्थापन केली म्हणून सूडबुद्धीने कामगार नेत्यांवर कारवाई करणे, अशा पद्धतीने काही कंपन्यांचे व्यवस्थापन कामगारांना वागणूक देत आहे. त्यामुळे या अन्यायाविरुद्ध कायदेशीर व आंदोलनात्मक लढा कसा द्यावा, याबाबत आम्ही मार्गदर्शन करणार आहोत.

    महत्वाची बाब म्हणजे नवीन कामगार कायद्यामुळे कायम कामगार पद्धत बंद होणार असून, कामगार संघटनादेखील संपुष्टात येणार आहेत. नवीन कामगार धोरण काय आहे, याबाबतदेखील या मेळाव्यात भोसले मार्गदर्शन करणार आहेत. सध्या ज्या उद्योग आणि कंपन्यांमध्ये वादविवाद सुरू आहेत. तेथील कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची प्रत्येक कंपनीमध्ये स्वतंत्र बैठक घेऊन आम्ही मार्गदर्शन करणार आहोत, असेही भोसले यांनी स्पष्ट केले.

    तसेच सर्व उद्योजकांच्या व कंत्राटदारांच्या संघटना आहेत. ते कामगारांची कशी पिळवणूक करायची, याबाबतचे धोरण एकत्रितपणे राबवीत असतात. तसेच शासनाला जाऊन भेटतात. त्याचप्रमाणे पोलिसांमार्फत एकत्र येऊन कामगारांची आंदोलने संपुष्टात आणतात. यासाठी कामगारांनी व संघटनांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे, असे मत यावेळी भोसले यांनी मांडले.