हिमाचलमध्ये जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू, सुखू सरकारच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत निर्णय

हिमाचल प्रदेश सरकारनं कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. हिमाचलमध्ये जुनी पेन्शन योजना मंजूर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांच्या मंत्रिमंडळाने शुक्रवारी पहिल्याच बैठकीत निवडणुकीदरम्यान दिलेले आश्वासन पूर्ण करत जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असे वृत्त ABP माझा वृत्तसंस्थेने दिले आहे.

    विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसने जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याचं आश्वासन दिले होते. राज्यात OPS लागू झाल्याने राज्यातील 1.36 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. OPS पुन्हा चालू करणारे हिमाचल हे चौथे राज्य ठरले आहे. याशिवाय महिलांना दरमहा 1500 पेन्शन आणि एक लाख नोकऱ्या देण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून त्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती रोडमॅप तयार करून महिनाभरात मंत्रिमंडळाला सादर करणार आहे.

    मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू म्हणाले की, काँग्रेसने निवडणुकीपूर्वी आश्वासन दिले होते की सत्तेत आल्यानंतर पहिल्या कॅबिनेट बैठकीत काँग्रेस जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करेल. याचा फायदा 1.36 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. सरकारने कर्मचाऱ्यांना ही लोहरीची भेट दिली आहे. त्यासाठी अनेक आव्हाने असली सरकारवर आर्थिक बोजा पडणार असला तरी हा निर्णय सरकारनं घेतला आहे.