बांधकाम कामगारांकरिता स्वतंत्र रूग्णालय निर्माण करावे - आमदार पंकज भोयर

कामगार मंञी सुरेश खाडे मागणी, जिल्हाधिकारी यांना याबाबत त्वरित निर्देश

वर्धा : वर्धा जिल्हा हा असंघटीत कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. वर्धा जिल्ह्यात बांधकाम कामगारांची बहुतांश संख्या असून, जिल्ह्यातील बहुतांश बांधकाम कामगारांनी कामगार विभागाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात स्वतःची नोंदणी केली आहे. स्वतःच्या आणि परिवाराच्या दोन वेळेच्या जेवनाची सोय करण्याकरीता बांधकाम कामगार हा रोजगाराच्या शोधात भटकत असतो. हाताला मिळेल ते काम असेल त्या परिस्थितीत करीत असतो. बांधकाम कामगारांना अनेकदा दुर्गंधी व धोकादायक परिस्थितीत काम करावे लागते अशा परिस्थितीत गंभीर आजार जडल्यास त्यांना मोठ्या रुग्णालयात आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेता येत नाही त्यामुळे अनेकांना जीवही गमवावा लागतो.

    वर्धा जिल्ह्यातील  बांधकाम कामगारांकरीता स्वतंत्र रुग्णालयाची व्यवस्था करावी, जेणे करून वर्धा जिल्ह्यातील  बांधकाम कामगारांना कुठल्याही मोठया आजाराचे उपचार निशुल्कपणे करता येईल. याकरीता कामगार विभागा अंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून तरतूद करून वर्धा जिल्ह्यातील  बांधकाम  कामगाराकरीता स्वतंत्र रुग्णालय निर्माण व्हावे अशी मागणी दिनांक २ नोव्हेंबर २०२२ रोजी याबाबत आमदार पंकज भोयर व स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष उमेश अग्निहोञी यांनी मंञालयात कामगार मंञी सुरेश खाडे यांना निवेदन दिले.

    कामगारांच्या आरोग्य संबंधित समस्या समजून घेतल्यानंत कामगार मंत्र्यांनी त्वरित जिल्हाधिकारी वर्धा यांना कामगार रूग्णालय उभारण्यासाठी त्वरित जागा उपलब्ध करावी असे निर्देश दिले. याच्यासह स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष उमेश अग्निहोञी यांनी वर्धा जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या विविध समस्याबाबत मंत्र्यांना अवगत केले सर्व प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येईल असे आश्वासन कामगार मंञी सुरेश खाडे यांनी दिले.