उपोषणाला बसलेले १६ कामगार रुग्णालयात दाखल

पुणे : डायचंड इंडिया सीट कंपनीतील 123 कामगार गेली पाच दिवसांपासून उपोषणाला बसले असून, त्यापैकी 16 कामगारांना प्रकृती बिघडल्यामुळे यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी काहींचे प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. मात्र या संदर्भात प्रशासन अद्याप डोळे झाकून असून या कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास कोणीही अद्याप फिरकलेले दिसत नाही असे वृत्त हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेने दिले आहे.

     डायचंड इंडिया सीट कंपनी चाकणस्थीत असून या कोरियन कंपनीमध्ये महिंद्राच्या गाड्यांचे आसन तयार करण्याचे काम चालते. गेल्या बारा वर्षात या कंपनीत एकही कायम कामगार नसून सर्व कामगार कंत्राटी म्हणून भरण्यात आले आहेत.या कामगारांच्या प्रश्नाबाबत राज्यातील झुंजार कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी सांगितले की, कंत्राटी कामगार व शिकाऊ कामगार म्हणूनच कामगारांची भरती केली आहे. कामगारांना कोणत्याही सोयी सवलती दिल्या जात नसून अद्याप पावतो कोणतीही पगारवाढ देण्यात आलेले नाही. याबाबत कंपनी प्रशासनाशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे येथे राष्ट्रीय श्रमिक आघाडीची युनियन स्थापन करून कामगारांच्या मागण्या संदर्भात लढा पुकारला आहे.