शासकीय मुद्रणालय कामगार संघटनेचे प्रशिक्षण शिबीर संपन्न

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय औद्योगिक कामगार संघटनेचे तीन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर नुकतेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे झाले. शिबिराला ८० कार्यकर्ते उपस्थित होते.

     शिबिराचे उद्घाटन शासन मुद्रण व लेखन सामग्री संचालनालयाचे संचालक रुपेंद्र मोरे यांनी केले. त्यांनी सद्यस्थितीत अपुरे मनुष्यबळ असुनही संघटनेच्या सहकार्याने शासनाची सर्व महत्वाची छपाई कामे विहित वेळेत पूर्ण होत आहेत. आता मुद्रणालयाचे आधुनिकीकरण होत असुन कामगारांचे सुद्धा आधुनिकीकरण होणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. 

    प्रमुख पाहुणे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय औद्योगिक कामगार संघटना ही शासकीय कर्मचारी चळवळीतील एक अग्रगण्य संघटना असून संघटनेचे आदर्श कार्यकर्ते कसे असावेत याविषयी प्रबोधन केले. स्थानिक आमदार योगेशदादा रामदासभाई कदम यांनी शिबीराला भेट दिली असता संघटनेचे प्रमुख सल्लागार  ज्येष्ठ कामगार नेते अविनाश दौंड यांनी संघटने समोरील महत्वाचे प्रश्न विषद केले. त्यावर आमदार महोदयांनी लेखी निवेदन द्यावे, विस्तृत चर्चा करून निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. 

     एस. टी. कामगार संघटनेचे नेते शेखर सावंत यांनी संघटने समोरील आव्हाने यासंबंधी विवेचन केले. महाराष्ट्र प्रेसेस फेडरेशनचे अध्यक्ष मारुती शिंदे यांनी शासनाची कामगार विषयक धोरणे आणि त्यावर करावयाच्या उपाययोजना या बाबत मार्गदर्शन केले. कृषी विद्यापीठ वसतीगृह प्रमुख एस.जी. पुरी  आणि मुद्रणालयातील इतर संस्था ,संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. 

     या सत्राचे प्रास्ताविक संघटना सरचिटणीस सुनील रासम, संचलन सहसचिव आर.टि. जाधव आणि उपाध्यक्ष गोकर्ण देवकर यांनी तर आभारप्रदर्शन संघटनेचे अध्यक्ष विजय चव्हाण यांनी केले.

    या शिबिराच्या दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ कामगार नेते आणि संघटनेचे सल्लागार अविनाशजी दौंड यांनी शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय औद्योगिक कामगार संघटनेच्या सन १९३० स्थापनेपासूनचा ९२ वर्षांचा इतिहास, राज्य सरकारी कर्मचारी चळवळीतचा ६० वर्षांचा इतिहास आपल्या ओघवत्या शैलीत चार तास कथन केला.

    तदनंतर उपस्थित शिबिरार्थींनी खुली चर्चा केली. या चर्चेला संघटनाध्यक्ष, सरचिटणीस आणि सल्लागार यांनी उत्तरे दिली. या प्रसंगी अमोल मोरे आणि ऋषीकेश डिचोलकर यांना उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून गौरविण्यात आले.

    शिबीर यशस्वी करण्यासाठी संघटनेचे माजी सरचिटणीस संभाजी दळवी आणि एस टी कामगार संघटनेचे दापोली शाखेचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब विचारे यांनी मोलाचे सहकार्य केले.