कामगारांचे थकीत पगारासाठी साखळी उपोषण

वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील वालचंदनगर कंपनीतील कामगारांचे गेल्या तीन महिन्यांपासून पगार रखडले असून, कामगारांची ओव्हरटाईम, वैद्यकीय आदी प्रकारची बिलेही थकली आहेत.त्यामुळे आय.एम. डी. कामगार समन्वय संघटनेच्या माध्यमातून शुक्रवार ६ ऑगस्टपासून कंपनीच्या पोस्ट कॉलनी गेटसमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. या संघटनेने कंपनीने थकवलेल्या देण्याबाबत उपकामगार आयुक्त, औद्योगिक न्यायालय तसेच जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे असे वृत्त पुढारी वृत्तसंस्थेने दिले आहे.

   या आंदोलनात आय. एम. डी. कामगार संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार गोंडगे, सेक्रेटरी प्रवीण बल्लाळ यांच्यासह अनेक कामगार सहभागी आहेत. व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून कामगार विविध प्रकारची तात्पुरती आंदोलने करत आहेत. गेटवर बोंबाबोंब, घंटानाद, थाळीनाद,ढोलकी नाद,भजन,कीर्तन अशा प्रकारची आंदोलने करून आपल्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही कंपनीने देणी दिली नसल्याने आता साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबल्याचे प्रवीण बल्लाळ यांनी सांगितले.

कंपनी सध्या आर्थिक अडचणीत आहे. मात्र त्यातूनही कामगारांचे पगार आणि थकीत देण्यासाठी कंपनी प्रयत्नशील असून लवकरच मार्ग निघेल. कंपनीने गेल्या ११० वर्षांच्या इतिहासात कामगारांची एक पैही बुडविली नाही. त्यामुळे कामगारांनी व्यवस्थापनाला सहकार्य करण्याची गरज आहे. - धीरज केसकर, फॅक्टरी मॅनेजर