राजगुरूनगर : खेड तालुक्यात जगातील मोठी एमआयडीसी व विशेष आर्थिक क्षेत्रातील कंपन्या व शिरूर हवेली मावळ तालुक्यातील कंपन्या असल्याने कामगारांचे न्यायालयीन प्रश्न सोडविण्यासाठी राजगुरूनगर येथे कामगार न्यायालय सुरू करावे, अशी मागणी खेड वकील बार असोसिएशनच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे असे वृत्त प्रभात वृत्तसंस्थेने दिले आहे.
वाफगाव (ता. खेड) येथे खेड वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. नवनाथ गावडे यांच्या हस्ते शरद पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, ऍड. अरुण मुळुक, उपाध्यक्ष ऍड. संतोष दाते, ऍड. प्रवीण पडवळ, ऍड. संदीप दरेकर आदी उपस्थित होते.
खेड तालुक्यामध्ये चाकण, महाळुंगे, खेड आळंदी या ठिकाणी मोठया प्रमाणात औद्योगिकीकरण झाले आहे.खेड तालुक्यामध्ये चाकण एमआयडीसीमध्ये नावाजलेल्या जागतिक दर्जाच्या अनेक कंपन्या आहेत. तालुक्यातील या कंपन्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. बहुतेक कामगार हे खेड तालुक्यामध्ये राहतात.
कंपन्यामध्ये मालक व नोकरदार यांच्यामध्ये होणारे वाद-विवाद निवारण करण्यासाठी या कामगारांना पुणे येथील कामगार न्यायालयात धाव घ्यावी लागते. चाकण पासून पुणे येथील कामगार न्यायालयाचे अंतर हे 40 ते 50 किलोमीटर आहे. खेड तालुक्यातील सर्व कामगारांना पुण्यात जाऊन त्यांच्या केसेस साठी वकील शोधणे अडचणीचे होते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
…तर जलद गतीने न्याय मिळेल
खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय आहे. यामध्ये कामगार न्यायालय सुरू केल्यास खेड, शिरूर मावळ, आंबेगाव या तालुक्यातील कामगारांना जवळ असलेल्या न्यायायलात न्याय मागण्यास सोपे जाईल. कामगारांचा वेळ वाया जाणार नाही. कामगारांचा खर्च देखील कमी होईल. खेड तालुक्यातील जिल्हा न्यायालयामध्ये एक कामगार न्यायालय सुरू केल्यास सर्व कंपन्यांचे मालक व कामगार यांना न्याय जलद गतीने मिळण्यास मदत होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.