उंब्रज : तासवडे, ता. कराड येथील एमआयडीसी मधील हिंदुस्तान कंपनीतील मशिनरी हलवण्यास कामगारांचा विरोध कायम असताना कंपनी व्यवस्थापनाने पुन्हा एकदा पोलीस बंदोबस्तात मशनरी हलवण्याचा प्रयत्न केला. परंतु सावध असलेल्या कामगारांनी कंपनीच्या गेटवर ठिय्या मारत मशनरी हलवण्यास तीव्र विरोध करत व्यवस्थापनाचा मशनरी हलवण्याचा प्रयत्न हाणून पाडला असे वृत्त IndiaReal वृत्तसंस्थेने दिले आहे.
दरम्यान, दिवसेंदिवस हा वाद चिघळत असून हिंदुस्थानात कंपनी व्यवस्थापन आणि कामगार यांच्यामधील वादावर लोकप्रतिनिधींकडून चर्चेतून मार्ग काढण्यासाठी बैठक घेण्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी कंपनी व्यवस्थापनाने हालचाली करत मशिनरी हलवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. परंतु याची कुणकुण कामगारांना लागताच कामगारांनी एकत्रित येत कंपनीच्या गेटवर ठिय्या मांडला. तीव्र विरोध करत मशनरी हलविण्याचा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी तळबीड सपोनि जयश्री पाटील आणि लोकप्रतिनिधींनी कामगारांच्या बरोबर चर्चा केली. दरम्यान, लोकप्रतिनिधीं, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत कंपनी व्यवस्थापन आणि कामगार यांच्यामध्ये दोन दिवसात पुन्हा एकदा बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी कामगारांकडून हिंदुस्तान कंपनीच्या व्यवस्थापन विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी वहागाव, तळबीड, तासवडे, हनुमानवाडी, वनवासमाची, बेलवडे येथील सरपंच कामगारांच्या बरोबरीने उपस्थित होते.
८ एप्रिलला उच्च न्यायालयात सुनावणी
हिंदुस्तान कंपनी व्यवस्थापन आणि कामगार यांच्यात वाद चालू असताना व्यवस्थापनाने गेल्या आठ दिवसापूर्वी कंपनीतील मशिनरी परस्पर हलवण्याचा घाट घातला. त्यावेळी कामगारांनी तीव्र विरोध करत कंपनीच्या मशिनरी बाहेर काढण्यास विरोध केला. त्यावेळी झालेल्या बैठकीमध्ये कंपनी व्यवस्थापन, पोलीस प्रशासन आणि कामगार संघटना यासह तळबीड, बेलवडे हवेली, तासवडे, वहागाव, हनुमानवाडी येथील सरपंच सामील झाले होते. त्यावेळी कामगारांनी कोर्टात जाऊन स्टे ऑर्डर आणावी, असे पोलिस प्रशासनाने कामगार संघटनाना सांगितले. त्यामुळे कामगार संघटनांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. परंतु सत्र न्यायालयात त्यांच्या पदरी निराशा पडली. नंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. या अपीलाची तारीख ८ एप्रिल रोजी आहे. उच्च न्यायालयात तारीख लांबल्यामुळे कामगार संघटनांनी पोलिसांना तशा प्रकारचे निवेदन दिले.
