वाळुज एमआयडीसी येथील एक्साईड इंडस्ट्रीज कामगारांचे उपोषण सुरू

औरंगाबाद : वाळुज एमआयडीसी मधील एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने (Exide Industries Limited) माथाडी कायदा लागू करावा तसेच कामगारांना तात्काळ कामावर घ्यावे या मागणीसाठी संघर्ष जनरल श्रमजीवी कामगार संघटना यांच्या वतीने उपोषण आज चालू करण्यात आले. 

एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड (Exide Industries Limited) येथे महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम १९६९ व औरंगाबाद जिल्हा माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार योजना १९९२ च्या तरतुदीनुसार आस्थापना / कारखान्याची मुख्य मालक म्हणून नोंदणी करणे, कलम ३० अन्वये लोडिंग, अनलोडिंग करणाऱ्या सर्व कामगारांची कामगार नोंदणी करणे, कामगारांनी केलेल्या कामाची मजुरी व लेवी मंडळात जमा करणे तसेच कंपनीने कामावरून कमी केलेल्या दोन कामगारांना पुन्हा कामावर घेणे या मागणीसाठी आज पासून चक्री उपोषण सुरू करण्यात आल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.

वरील विविध मागण्यांसाठी संघटनेतर्फे मागील ३ वर्षांपासून पाठपुरवठा केला गेला. १७ जून २०२१ रोजी आंदोलन केल्यानंतर कंपनीने सर्व मागण्या मान्य केल्या व त्यानंतर पुढे काहीच कार्यवाही झाली नाही तसेच या दरम्यान कंपनीने दोन कामगारांना कामावरून कमी केले त्यामुळे संघटनेला नाईलाजास्तव उपोषण करणे भाग पडले तसेच या प्रकरणाबाबत सरकारी कामगार अधिकारी तथा सचिव औरंगाबाद माथाडी व असुरक्षित कामगार मंडळ यांनी कंपनीला देखील याबाबत पत्र दिले असल्याची माहिती संघटना अध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांनी दिली.