पुणे : आशा सेविकांना (Asha workers) किमान वेतन (minimum wage) लागू करावे, अशी शिफारस महाराष्ट्र किमान वेतन सल्लागार मंडळातर्फे राज्य सरकारला करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना उपनेते, राज्याच्या किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक यांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने हाती घेतलेल्या मोहिमेत आशा सेविका, गटप्रवर्तकांचा सक्तीने समावेश केला आहे. मात्र कोरोना काळात कार्यरत आरोग्य कर्मचारी, अधिकाऱ्यांना अधिक प्रोत्साहन भत्ता दिला जात असताना अल्प मानधनावर काम करणाऱ्या अशा सेविकांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला वेळेत मिळत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत आहे.
त्यामुळे आशा सेविका व गटप्रवर्तक यांना योग्य मानधन, आरोग्य सुविधा, विमा योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे डॉ.रघुनाथ कुचिक यांनी केली.