महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून राज्यातील कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार शिष्यवृत्ती मिळणार आहे. यासाठी आता ३१ डिसेंबर ऐवजी ३१ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ दरवर्षी कामगार पाल्यांना (ज्यांच्या वेतनातून डिसेंबर व जूनमध्ये कामगार कल्याण निधी २५ रुपये कपात होतात.) इयत्ता नववी उत्तीर्णपासून पुढे ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणाऱ्यांना शिष्यवृत्ती देते. नववी उत्तीर्ण ते बारावीपर्यंत दोन हजार रुपये, पदवी व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून अडीच हजार रुपये, पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून तीन हजार रुपये, पदवी व्यावसायिक अभ्यासक्रम पाच हजार रुपये, पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी पाच हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते.
शिष्यवृत्तीची रक्कम पाल्याच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्यासाठी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत ऑनलाइन अर्ज भरणे अनिवार्य होते. या मुदतीत अनेकांना अर्ज सादर करता आले नाहीत. अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी राज्यभरातून झाल्याने ३१ जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
आवश्यक कागदपत्रे -
- मागील वर्षीची गुणपत्रिका
- चालू वर्षाचे बोनाफाइड
- कामगार व पाल्याचे आधार कार्ड
- पाल्याचे बँकेचे पासबुक
- कामगाराचा वार्षिक उत्पन्नाचा आस्थापना दाखला