EPFO चा मोठा निर्णय! विशेष परिस्थितीत PF खात्यातील १००% रक्कम काढता येणार

नोकरदार वर्गासाठी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) एक अत्यंत दिलासादायक आणि मोठा निर्णय घेतला आहे. आता काही विशेष परिस्थितींमध्ये पीएफ (PF) खातेधारक आपल्या खात्यातील १०० टक्के (पूर्ण) रक्कम काढू शकणार आहेत.

   विशेष म्हणजे, यासाठी आता कोणत्याही प्रकारचे कारण सांगण्याची किंवा पुरावे देण्याची गरज भासणार नाही. EPFO च्या या महत्त्वपूर्ण बदलामुळे क्लेम रिजेक्ट(नाकरण्याचे) होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल आणि कर्मचाऱ्यांना गरजेच्या वेळी तातडीने आर्थिक मदत मिळणे सोपे होणार आहे असे वृत्त लोकमत वृत्तसंस्थेने दिले आहे.

PF काढण्याची प्रक्रिया झाली अधिक सुलभ

EPFO ने सदस्य-केंद्रित सुधारणांचा भाग म्हणून PF पैसे काढण्याच्या प्रक्रियेत बदल केले आहेत. पूर्वी विशेष परिस्थितीत संपूर्ण PF रक्कम काढण्यासाठी निधी काढण्याचे कारण नमूद करावे लागत होते, संबंधित कागदपत्रे सादर करावी लागत होती आणि कारण मान्य श्रेणीत नसल्यास अर्ज नाकारला जात होता. आता नवीन नियमांनुसार, पात्र सदस्य "स्पेशल केस" श्रेणीत कारण न देता अर्ज करू शकतील, ज्यामुळे प्रक्रिया अधिक वेगवान आणि सोपी होणार आहे.

कोणत्या परिस्थितीत १००% PF रक्कम काढता येणार?

EPFO च्या नव्या नियमांनुसार खालील विशेष परिस्थितींमध्ये संपूर्ण PF निधी काढण्याची परवानगी मिळू शकते.

कंपनी दीर्घकाळ बंद होणे

कंपनीत १५ दिवसांपेक्षा जास्त काळ लॉकआउट असणे

उद्योग किंवा संस्था बंद पडणे

विनामोबदला बेरोजगारी

कंपनी बंद झाल्यानंतर कर्मचाऱ्याला कोणतीही भरपाई न मिळणे

दीर्घकाळ बेरोजगार राहणे

दोन महिन्यांहून अधिक काळ पगार न मिळणे

नोकरी गमावणे किंवा कायदेशीर वाद

सेवेतून बडतर्फी

नोकरी जाणे

कामगार वाद न्यायालयात प्रलंबित असणे

गंभीर आजार

अशा परिस्थितींमध्येही १००% PF काढण्याची सुविधा उपलब्ध असू शकते.

सामान्य परिस्थितीत काय नियम लागू राहतील?

EPFO ने स्पष्ट केले आहे की १००% निधी काढण्याची सुविधा केवळ विशेष परिस्थितींसाठीच आहे. सामान्य परिस्थितीत PF खात्यातील जास्तीत जास्त ७५ टक्के रक्कम काढता येईल, उर्वरित रक्कम निवृत्ती बचतीसाठी खात्यात कायम राहील. मात्र, "स्पेशल केस" अंतर्गत पात्रता पूर्ण झाल्यास सदस्यांना संपूर्ण निधी काढण्याची परवानगी दिली जाईल.

कर्मचाऱ्यांना मिळणार आर्थिक दिलासा

EPFO च्या मते, आर्थिक संकट, बेरोजगारी किंवा वैद्यकीय आणीबाणीच्या काळात कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या बचत निधीपर्यंत अधिक सुलभ आणि जलद प्रवेश मिळावा, हा या बदलामागील मुख्य उद्देश आहे.